Wednesday, September 5, 2018

माणूसकी               

Image result for manuski images
              सुमन आज खूप आनंदात होती . का नाही असणार ? तिच्या मैत्रिणीचा मोनाचा फोन आला होता. तिने सुमनला व श्रीधरला भीमाशंकरला सहलीस येण्यास आमंत्रित केले होते . सुमननेही लगेचच होकार दिला. श्रीधर घरी आल्या आल्या तिने मोनाने त्यांना दोघांना निमंत्रण दिले आहे , हे सांगितले. त्यालाही ही कल्पना आवडली, सहलीस जाण्यासाठी सुमनने व मोनाने आवश्यक ती सर्व तयारी केली. ते सर्व इतके आनंदी होते की , सहलीला जाऊन काय करायचे , काय घ्यायचे याची यादी सतत तपासून पाहत होते. सकाळी सकाळी थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता, इतक्या पहाटे ते सर्वजण भीमाशंकरच्या रस्त्याला लागले. सहलीची मजा ते धमाल , मस्ती , गाणी म्हणत घेऊ लागले. भीमाशंकरचे ते नयनरम्य वातावरण , ती दाट झाडी - झुडपी , तो पक्षांचा किलबिलाट , तो झाडांचा कुजबुजाट , नदीचे झुळझुळणे हे सर्व मनाला प्रसन्न करत होते . खूप सुंदर मनाला प्रसन्न करणारे ते वातावरण होते. सर्वानी महादेवाचे दर्शन घेतले तेथील अभयारण्य पाहिले, तेथील वातावरणाचा आस्वाद घेतला. तसेही त्यांना शहरी वातावरणापासून लांब जायचे होते ते येथे खूप रमले तेथे धमाल केली, सोबत आणलेला फराळ , जेवण फस्त केले.
                                 सूर्य मावळतीच्या वेळेस डोंगरावरून तो खूप छान दिसत होता पण त्यांना लवकर तेथून निघायचे होते . त्यांनी परतीचा मार्ग धरला एका सूनसान रस्त्यावरून गाडी जात होती रस्ता हळूहळू रहस्यमय वाटु लागला, अंधार केव्हा झाला हे कळलंही नाही  तितक्यात , त्या गूढ , रहस्यमय रस्यावर सुमनची गाडी बंद पडली . त्या मार्गावर जवळपास कुठेही दुसरे वाहन किंवा राहण्यासाठी हॉटेल , आश्रम काही ही नव्हत . साधी विचारपूस करायला माणूसही दिसत नव्हता , आणि गाडी काही केल्या चालू होतं नव्हती त्यांचा जीव काकुळतीला आला होता . त्या भयाण , गुढ , अंधारमय रस्त्यावर त्यांना भीती वाटू लागली के करावं ते त्यांना सुचत नव्हतं , तेथे आसपास कोणीही दिसत नव्हते त्यामुळे ते अधिकच घाबरले ,कुठे जावे, हे त्यांना कळत नव्हते .श्रीधरने गाडी बाजूला लावली , आणि ते सर्वजण आपला जीव मुठीत धरून त्या गाडीतच जाउन बसले . गाडीच्या काचा नीट लावून घेतल्या. तेवड्यात कुणीतरी दरवाज्यावर थाप मारल्याचे ऐकू आले . ती व्यक्ती काहितरी सांगण्याचा प्रयत्न करत होती . श्रीधरने काच खाली केली , तर एक माणूस हातात कंदील घेऊन उभा होता  व तो काच खाली केल्या-केल्या  पटकन बोलला , "साहेब घाबरू नगा म्या हाय ना, चला इथन लवकर चला इथल वातावरण लई भयाण हाय , इथं जवळचं माई झोपडी हाय , तुम्हीं समदे काय बी काळजी करू नगा बगा , तुमची समदी यवस्था व्यईल बगा आमच्या वस्थित चला बघू बीगी बीगी . कायतरी विपरित घडण्याच्या आत इथन चला आदी !
                               त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं एकिकडे हा अनोळखी माणूस आणि सभोवताली किर्र अंधार , दाट झाडचं झाड आणि वाटत असलेली भीती . त्या माणसावर विश्वास टाकण्यापलिकडे त्यांच्या जवळ काहीच पर्याय नव्हता . मग जराही मनात किंतु न बाळगता त्यांनी त्या माणसाबरोबर जाण्याचं ठरवलं . गाडीतील बॅग सोबत घेतली व गाडीला लॉक केले , बरेच अंतर चालल्यावर त्यांना त्या माणसाची वस्ती दिसली त्या माणसासोबत कंदिलाच्या उजेडात चालत ते सर्वजण त्यांच्या झोपडीत गेले . तेथे त्याची चार मुले बायको होती त्या माणसाने यांची ओळख त्याच्या परिवाराला करून दिली . त्याच्या बायकोने हसतमुखाने यांचे स्वागत केले तिने पटकन चूल पेटवली , त्यावर पिठलं व भाकरी केली व सुमन , श्रीधर , मोना व तिचे पती यांना गरमागरम भाकरी , पिठलं , लोणंच , मिरची , कांदा अस साग्रसंगीत जेवण वाढलं . जेवण झाल्यावर त्या माणसाने यांची झोपडीत झोपण्याची व्यवस्था केली व ते झोपडीच्या बाहेर झोपले . तरीही त्यांना भीती वाटतच होती रात्रभर जीव मुठीत ठेऊन ते झोपी गेले . 
                                सकाळी जाग आल्यावर ते पाहतात तर त्यांच्याजवळचे सर्व सामान गायब , बाहेरही त्यांना कोणीही दिसत नव्हते ते सर्वजण खूप घाबरले कमीत कमी जीव वाचला म्हणून ते देवाचे आभार मानत होते आणि त्यांच्या निर्णयाचा पश्चातापही ते  करत होते , ते काही वेळ झोपडीतच बसून राहिले . काही वेळानंतर त्यांना गाडीचा आवाज आला म्हणून ती सर्व काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आले . तर सर्व लोक त्यांच्या गाडीभोवती होती व ते दिसताच तो माणूस म्हणाला , " साहेब माफ करा , तुम्ही दमला होता ना म्हणून न्हाय उटीवल . तुमची गाडी सुरू केली बारं का ह्यो आमचा शेजारी राम ह्यानं गाडी सुरू केली बरं का . लई हुशार हाय बगा गडी पण त्याचा इथं काय उपेगच होत न्हाय बगा . जाऊ द्या आमची बडबड सरायची न्हाय तुमचं समदं  सामान गाडीत ठिवलय बगा . तपासून बगा काय कमी जास्ती असलं तर आमच्यावर बला यायला नग काय ? " 
                           एवढयावरही सुमन मोनाने सामान तपासून पाहिले सामान बरोबर होते. तेथून निघताना श्रीधरने त्या माणसाच्या हातावर पैसे ठेवले तर त्यांनी ते घेण्यास नकार दिला . सुमनने घरी गेल्यावर परत सामान तपासून पाहिले . ते बरोबर होते . एक अनोळखी माणूस अनोळखी माणसासाठी एवढे सगळं करू शकतो तेही निस्वार्थीपणे कसलाही मोबदला न मागता , असे शहरातले कोणीच करू शकत नाही . हा विचार मनात येऊन सुमन आतल्या आत रडत होती . तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता .
                             सुमन आतल्या आत विचार करू लागली की , खरचं आपण शहरातली माणसं अशी संकुचित व संशयी का असतो ? आपल्याला का नाही बर जमत एखाद्याला जिवापाड मदत करणं , कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अडचणीत धावून जाणं ......... खरचं का नाही जमत ? आज जे त्या माणसाने आमच्यासाठी केलं त्यालाच तर खरी माणुसकी म्हणतात .

प्राजक्ता योगिराज निकुरे
( Email id.- prajaktanikure@gmail.com )




Tuesday, September 4, 2018

  पाऊस 
               त्या राञी तो धो-धो कोसळत होता. त्याच्या येण्याने सर्वजण खुप आनंदी झाले होते. तो येताना ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मोरांचा नाच , बेडकांचे डराँव डराँव , झाडांचा कुजबुजाट चालू होता. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. सर्व वातावरण आनंदमय झाले होते. आपली माय धरती मातेला कधी त्याला आपल्या कुशीत घेऊ असे तिला झाले होते.पण ती माञ या आनंदमय वातावरणातही आनंदी दिसत नव्हती , तिचे डोळे आशेने खिडकीतुन सतत रस्तावर कोणाला तरी शोधत होते. ती अस्वस्थ होती, बिथरलेली होती किंबहुना घाबरलेली होती. तिच्या हरिणासारख्या टपोरी डोळ्यातून सतत अश्रुंचे ओघळ वाहत होते. सर्व वातावरण आनंदी असताना ती एकटीच दुःखी का होती ? असं काय दुःख होते तिच्या आयुष्यात.
               या आनंदमय वातावरणात कोणाही तरूण स्त्रीला या पावसात चिंब चिंब भिजावेसे वाटते. मनोमुराद या पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण या सर्वात ती वेगळी होती. डोळ्यातून पाणी वाहत असताना ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. किती चांगले होते तिचे जीवन. काँलजचे शिक्षण संपल्यावर तिने L.L.B. पुर्ण केले, आणि पुण्यात ती L.L.B. ची प्रँक्टिस करू लागली. सर्व काही मजेत चालु होते. तिच्या करियरला एक नवीनच दिशा मिळाली होती. आजच्या घडीला वकिल म्हणून ती नावारूपाला आली होती. एक दिवस तिला एक स्थळ सांगून आले. घरचे सर्व सुशिक्षित , प्रेमळ , नोकरदार होते. मुलगा चांगला डाँक्टर झालेला होता. त्याचीही प्रक्टिस व्यवस्थित चालू होती. दोन्ही ठिकाणाहून होकार आला, लग्नाची बोलणी झाली. अगदी थाटामाटात लग्न झाले.
             ती लग्न झाल्यावर खुप आनंदी होती. त्या परिवारात तिला कधीही आई वडिलांची उणिव जाणवली नाही. सर्वांनी तिला खुप समजून घेतली. तिला मुलीसारखे जपले , तिला तर अगदी आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. सर्वच सुख आज माझ्या झोळीत पडले आहे ,माझ्या आयुष्यात आता सुखच सुख आहे असे तिला वाटू लागले. यासाठी ती देवाचे सतत आभार मानत असे. प्रेमळ नवरा , प्रेमळ सासू-सासरे तिला मिळाले होते. तिची वकिलीची प्रँक्टिस करायलाही त्यांनी तिला परवानगी दिली. तिला सहकार्य केले , प्रोत्साहन दिले. दोन वर्षानंतर गोंडस असा मुलगा तिला झाला. यापेक्षा आणखी काय हवे होते तिला. आपल्याला सर्वच सुख मिळाले आहे , हा विचार करून ती मनोमन आनंदी होती. सहज, तिच्या सासू सासऱ्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. ते पावसाळ्याचे दिवस होते. तीर्थयात्रेला जाण्यासाठी आवश्यक ती सर्वच तयारी तिने त्यांना करून दिली. तिने त्यांच्या मुलाने व नातवाने आपल्या आजी आजोबांना तीर्थयात्रेस जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आई वडिल तीर्थयात्रेस गेल्यानंतर मुलगाही लगेच हाँस्पिटलमध्ये गेला. घरी ती आणि तिचा मुलगा असे दोघेचजण होते.
             त्या रात्री खूप भयानक धोधो-धोधो वादळ वावटळासह पाऊस आला. त्या पावसाने सर्वीकडे हाहाकार माजवला . काहींची घरे वाहून गेली. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर , नंतर दुसऱ्या मजल्यावर पाणी शिरले. रस्त्यावर पाणी साचले. रस्त्याची नदी तयार झाली. रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. दरडी कोसळल्या , विजेचा संपर्क तुटला , टेलिफोनचा संपर्क तुटला. या पुरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांचा संसार तुटला. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. या सर्वात ती सुध्दा होती. तिने रंगवलेली स्वपने , तिचा संसार विखुरला. ओंजळीत तीन वर्षाचे मुल. त्याचा सांभाळ तिच्या डोक्यावर होता. त्या रात्री ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये पाणी घुसले. सुदैवाने ती चौथ्या मजल्यावर राहत होती. पहिल्या मजल्यावरील , दुसऱ्या मजल्यावरील लोक वर आले होते. तिसऱ्या दिवशी तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. दोन दिवस तिचा आणि तिच्या नवऱ्याचा संपर्क नव्हता . सासू सासऱ्यांचा संपर्क नव्हता. अनेक विचारांनी ती घाबरलेली होती. पण जे देवाच्या मनात होते ते शेवटी घडतेच. त्यात कोणीही फेरबदल करू शकत नाही किंवा तो करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तिसऱ्या दिवशी तिला कळाले की , तिचा नवरा घरी येत असताना पुरात तो वाहून गेला. त्याने विचार केला असावा की , पूर काही येणार नाही पण क्षणार्धात होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. तिच्या सासू सासऱ्यांच्या गाडीवर दरड कोसळली आणि ते तेथेच ठार झाले. तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. तिने या गोष्टीचा कधी विचारही केला नसेल पण तिच्यासाठी ती एक काळरात्र ठरली होती.
               आजही तो दिवस आठवला की तिच्या अंगावर काटा उभा राहतो. त्या एका रात्रीने तिचा संसार उद्ध्वस्त झाला. लहान मुलाचा सांभाळ आता तिच्या डोक्यावर होता. आता ती त्याच्याकडे पाहूनच जगत होती. तिच्या मनाला झालेल्या जखमा पुसू पाहत होती पण या अशा जखमा आहेत की, त्या कधीही भरून निघू शकत नव्हत्या. आज परत पाऊस आला आणि तिच्या आठवणी जाग्या झाल्या. ती आज इतकी वर्षे त्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही ती त्या आठवणी विसरु शकत नव्हती म्हणून आज बाहेर आनंदाचे वातावरण असले तरी ती आनंदी नव्हती परत एकदा तिच्या जखमा ओल्या झाल्या होत्या.
                                तेवढ्यात तिला तिच्या मुलाचा आवाज आला, " आई, मला जेवायला वाढ ना मला खुप भूक लागली आहे" आणि ती चेहऱ्यावर हासू घेऊन तिच्या मुलाला वाढायला निघून गेली.

प्राजक्ता योगिराज निकुरे
Email id:- prajajtanikure@gmail.com