पाऊस
त्या राञी तो धो-धो कोसळत होता. त्याच्या येण्याने सर्वजण खुप आनंदी झाले होते. तो येताना ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मोरांचा नाच , बेडकांचे डराँव डराँव , झाडांचा कुजबुजाट चालू होता. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. सर्व वातावरण आनंदमय झाले होते. आपली माय धरती मातेला कधी त्याला आपल्या कुशीत घेऊ असे तिला झाले होते.पण ती माञ या आनंदमय वातावरणातही आनंदी दिसत नव्हती , तिचे डोळे आशेने खिडकीतुन सतत रस्तावर कोणाला तरी शोधत होते. ती अस्वस्थ होती, बिथरलेली होती किंबहुना घाबरलेली होती. तिच्या हरिणासारख्या टपोरी डोळ्यातून सतत अश्रुंचे ओघळ वाहत होते. सर्व वातावरण आनंदी असताना ती एकटीच दुःखी का होती ? असं काय दुःख होते तिच्या आयुष्यात.या आनंदमय वातावरणात कोणाही तरूण स्त्रीला या पावसात चिंब चिंब भिजावेसे वाटते. मनोमुराद या पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण या सर्वात ती वेगळी होती. डोळ्यातून पाणी वाहत असताना ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. किती चांगले होते तिचे जीवन. काँलजचे शिक्षण संपल्यावर तिने L.L.B. पुर्ण केले, आणि पुण्यात ती L.L.B. ची प्रँक्टिस करू लागली. सर्व काही मजेत चालु होते. तिच्या करियरला एक नवीनच दिशा मिळाली होती. आजच्या घडीला वकिल म्हणून ती नावारूपाला आली होती. एक दिवस तिला एक स्थळ सांगून आले. घरचे सर्व सुशिक्षित , प्रेमळ , नोकरदार होते. मुलगा चांगला डाँक्टर झालेला होता. त्याचीही प्रक्टिस व्यवस्थित चालू होती. दोन्ही ठिकाणाहून होकार आला, लग्नाची बोलणी झाली. अगदी थाटामाटात लग्न झाले.
ती लग्न झाल्यावर खुप आनंदी होती. त्या परिवारात तिला कधीही आई वडिलांची उणिव जाणवली नाही. सर्वांनी तिला खुप समजून घेतली. तिला मुलीसारखे जपले , तिला तर अगदी आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. सर्वच सुख आज माझ्या झोळीत पडले आहे ,माझ्या आयुष्यात आता सुखच सुख आहे असे तिला वाटू लागले. यासाठी ती देवाचे सतत आभार मानत असे. प्रेमळ नवरा , प्रेमळ सासू-सासरे तिला मिळाले होते. तिची वकिलीची प्रँक्टिस करायलाही त्यांनी तिला परवानगी दिली. तिला सहकार्य केले , प्रोत्साहन दिले. दोन वर्षानंतर गोंडस असा मुलगा तिला झाला. यापेक्षा आणखी काय हवे होते तिला. आपल्याला सर्वच सुख मिळाले आहे , हा विचार करून ती मनोमन आनंदी होती. सहज, तिच्या सासू सासऱ्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. ते पावसाळ्याचे दिवस होते. तीर्थयात्रेला जाण्यासाठी आवश्यक ती सर्वच तयारी तिने त्यांना करून दिली. तिने त्यांच्या मुलाने व नातवाने आपल्या आजी आजोबांना तीर्थयात्रेस जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आई वडिल तीर्थयात्रेस गेल्यानंतर मुलगाही लगेच हाँस्पिटलमध्ये गेला. घरी ती आणि तिचा मुलगा असे दोघेचजण होते.
त्या रात्री खूप भयानक धोधो-धोधो वादळ वावटळासह पाऊस आला. त्या पावसाने सर्वीकडे हाहाकार माजवला . काहींची घरे वाहून गेली. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर , नंतर दुसऱ्या मजल्यावर पाणी शिरले. रस्त्यावर पाणी साचले. रस्त्याची नदी तयार झाली. रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. दरडी कोसळल्या , विजेचा संपर्क तुटला , टेलिफोनचा संपर्क तुटला. या पुरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांचा संसार तुटला. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. या सर्वात ती सुध्दा होती. तिने रंगवलेली स्वपने , तिचा संसार विखुरला. ओंजळीत तीन वर्षाचे मुल. त्याचा सांभाळ तिच्या डोक्यावर होता. त्या रात्री ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये पाणी घुसले. सुदैवाने ती चौथ्या मजल्यावर राहत होती. पहिल्या मजल्यावरील , दुसऱ्या मजल्यावरील लोक वर आले होते. तिसऱ्या दिवशी तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. दोन दिवस तिचा आणि तिच्या नवऱ्याचा संपर्क नव्हता . सासू सासऱ्यांचा संपर्क नव्हता. अनेक विचारांनी ती घाबरलेली होती. पण जे देवाच्या मनात होते ते शेवटी घडतेच. त्यात कोणीही फेरबदल करू शकत नाही किंवा तो करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तिसऱ्या दिवशी तिला कळाले की , तिचा नवरा घरी येत असताना पुरात तो वाहून गेला. त्याने विचार केला असावा की , पूर काही येणार नाही पण क्षणार्धात होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. तिच्या सासू सासऱ्यांच्या गाडीवर दरड कोसळली आणि ते तेथेच ठार झाले. तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. तिने या गोष्टीचा कधी विचारही केला नसेल पण तिच्यासाठी ती एक काळरात्र ठरली होती.
आजही तो दिवस आठवला की तिच्या अंगावर काटा उभा राहतो. त्या एका रात्रीने तिचा संसार उद्ध्वस्त झाला. लहान मुलाचा सांभाळ आता तिच्या डोक्यावर होता. आता ती त्याच्याकडे पाहूनच जगत होती. तिच्या मनाला झालेल्या जखमा पुसू पाहत होती पण या अशा जखमा आहेत की, त्या कधीही भरून निघू शकत नव्हत्या. आज परत पाऊस आला आणि तिच्या आठवणी जाग्या झाल्या. ती आज इतकी वर्षे त्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही ती त्या आठवणी विसरु शकत नव्हती म्हणून आज बाहेर आनंदाचे वातावरण असले तरी ती आनंदी नव्हती परत एकदा तिच्या जखमा ओल्या झाल्या होत्या.
तेवढ्यात तिला तिच्या मुलाचा आवाज आला, " आई, मला जेवायला वाढ ना मला खुप भूक लागली आहे" आणि ती चेहऱ्यावर हासू घेऊन तिच्या मुलाला वाढायला निघून गेली.
प्राजक्ता योगिराज निकुरे
Email id:- prajajtanikure@gmail.com
1 comment:
Post a Comment